तू फक्त…

तू फक्त…
उगाचचे तिचे बोल
कधी फक्त ऐकून घे,
रुसवा तिचा अबोल,
कधी फक्त समजून घे।
तिची धुसमुस,
कधी फक्त जाणून घे,
तिची मुसमुस,
कधी फक्त पुसून घे।
ती करेल प्रेम व्यक्त,
प्रेमात तिच्या न्हाऊन घे,
कधी राहील अव्यक्त,
तू तुझे प्रेम सांडून घे।
एक अनोखी दुनिया,
तिच्या डोळ्यात पाहून घे,
तिची सारी किमया,
तू कधी हरवून घे।
तिखट खारट जेवण,
गोड मानून घे,
तिच्या मनाचं चांदणं,
तू फक्त पांघरूण घे।
धडपडली तर,
तू कधी सावरून घे,
झाला पसारा तर,
तू ही कधी आवरून घे।
तिचं रणकंदन,
तू कधी थोपवून घे,
कधी ती मौन,
नजरेनेच बोलून घे।
तिच्या वेडेपणाला,
तू मनमुराद हसून घे,
तिच्या पोरसपणाला,
पोरसपणानेच बघून घे।
कधी हरवली,
तर तू तिला शोधून घे,
अश्रूत भिजली,
कोमलतेने स्पर्शून घे।
उधळेल ती सप्तरंग,
रंगात तिच्या रंगून घे,
तिच्या मनाचे तरंग,
तुही त्यात वाहून घे।
तिला हवी तुझी साथ,
पापण्यात तिला मिटून घे,
तुझ्या प्रेमाची आस,
श्वासात तिला भरून घे।
डॉ स्वप्ना
Advertisements

“पुन्हा उभं राहायचं”

मोडून पडला संसार तरी मोडू देऊ नका कणा, एकमेकांना हात देऊन फक्त लढ म्हणा।

अख्ख आयुष्य पणाला लावून उभा केलेला संसार नेसत्या  वस्त्रनिशी सोडणं,
गोठ्यातली गाय, बैल, म्हैशी मध्ये जीव अडकणं,
त्यांना सोडल्याची खंत करत आयुष्यभर झुरणं,
काबाडकष्ट करून कसलेल्या शेतीचं उभं पीक पाण्यात वाहून जाणं,
आणि हे सारं उघडया डोळ्यांनी पाहणं…

सोपं नसतं, घर सोडलेल्या माणसाचं जगणं…

पाणी ओसरेल, पुन्हा घरी परत जाल,
पण तिथे घर असेलच असे नाही,
वाहून गेल्या असतील भिंती,
विझून गेल्या असतील वाती,
घरभर झाली असेल माती,
कुजून गेली असतील धान्याची पोती,
बुडून गेली असेल शेती,

…लोकहो तरीही धीर सोडू नका,
असे खचून जाऊ नका,

निसर्गापुढे कुणाचंच चालत नाही,
निसर्गशिवाय कुणाचंच चालत नाही,

याच पाण्याकडून वाहणं शिकायचं,
पुन्हा नव्यानं घरटं उभारायचं,

पण पुन्हा उभं राहायचं.. उभं राहायचं…
मदतीचा हा शिधा तुमच्यासाठी..
दवा आणि दुवा तुमच्यासाठी..

✍️ डॉ स्वप्ना

“सत्यमेव जयते”

फक्त कथा कवितांत असतो,
सत्याचा विजय,
सत्याचा विषय,
सत्याचा आशय,
सत्याचा निश्चय.
प्रत्यक्षात मात्र खोटं,
बिनदिक्कत मिरवत असतं,
निर्लज्जपणे भूलवत असतं,
पैशांचं नाणं खणखणतं असतं,
सत्तेने माजलेलं असतं.
यामुळेच होतो,
सत्याचा अस्त,
माणुसकी ग्रहणग्रस्त,
कर्तव्य कीडग्रस्त,
प्रामाणिक चिंताग्रस्त.
सत्याचा विजय,
होत नसतो सहज,
काढावा लागतो गळा काढून आवाज,
उतरावा लागतो मस्तवालांचा माज,
सारंच अवघड झालंय आज,
काटे चमच्यांनी सोडलीय लाज.
यांची नेहमीच असते,
गिरे तो भी टांग उपर,
दुसऱ्यांची माथी खापर,
स्वतःचं इमान बेघर,
सत्ता आणि पैशांचा बाजार.
सरळमार्गी खरा माणूस,
विझून जातो,
दबून जातो,
विखरून जातो,
झुरून मरतो,
मरून झुरतो,
शेवटी चितेवर जळतो…
म्हणे सत्याचा विजय होतो…
कारण या जगात,
खणखणतं ते नाणं असतं,
चकाकतं ते सोनं असतं,
जो बोलतो त्याचंच गाणं असतं,
जे चमचे त्यांचंच खाणं असतं,
भसम्या झालेल्या बकासुरांचं
फक्त पोट भरणं असतं,
गोरगरीबाला फक्त लुटणं असतं.
कसं जगायचं,
काय शिकायचं,
उघड्या डोळ्यांनी फक्त पाहत राहायचं??
की आंधळं असण्याचं नाटक करायचं?
सांगा सांगा कसें जगायचं???
सहन करत की झुंज देत??
✍️ डॉ. स्वप्ना

✍🏻शब्द ✍🏻

काही शब्दांत सामर्थ्य असते.

एक अनोखे सौंदर्य असते.

जगवण्याचं सत्व असते.

जगण्याचे तत्व असते.

विचारांचं शस्त्र असते.

समाधानाचे शास्त्र असते.

दूरगामी दृष्टी असते.

परिणामांची श्रुष्टी असते.

अस्तित्वाचे भान असते.

कर्तृत्वाची शान असते.

ध्येयासक्तीची शक्ती असते.

निखळ निष्काम भक्ती असते.

प्रखर प्रतिभा असते.

निडर प्रतिमा असते.

काळोख मिटवण्याचं तेज असते.

कल्पतरूचे बीज असते.

माझे तुझे जगणे असते,

सप्तरंगात रंगणे असते.

✍🏻डॉ स्वप्ना

😫किरकिरे आणि कुरबूरे😫

😫किरकिरे आणि कुरबूरे😫

माणसे कर्तृत्वाने मोठी होतात! फक्त मोठीच नाही तर विशाल होतात, महाकाय होतात, आकाराने नाही तर विचाराने. विकाराने नाही, तर आचाराने. स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्याची किंवा त्याची निंदा करण्याची गरजच नसते. प्रत्येकाची एक वेगळी अशी प्रतिभा असते, तिला एकाच तराजूमध्ये तोलून कसे चालेल?? कोणी उत्तम डॉक्टर असतो, कोणी वकील असतो, कुणी उत्तम कलाकार असतो, कुणी उत्तम ड्रायव्हर असतो, कुणी उत्तम माणूस असतो, तुलना का करायची? स्पर्धा करायचीच तर माणूस बनण्याची करावी. जो तो ज्याच्या त्याच्या जागी श्रेष्ठ असतो, हे श्रेष्ठत्व सहजपणे स्वीकारता ही आले पाहिजे. एकमेकांच्या कर्तव्याचा आदर करता आला पाहिजे.
एखाद्याचे श्रेष्ठत्व हे त्याच्या कर्तृत्वातून झळकते, त्याच्या आचारात आणि विचारात गवसते. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण!! महाकाय झाडे आपल्या फक्त अस्तित्वाने येणाऱ्या जाणाऱ्यांना सावली देतात, आधार देतात. तसंच काहीसे या माणसांचे पण असते, जेथे जातात तेथे आपल्या अस्तित्वाची शीतल छत्रछाया पसरतात.
पण काही लोकांना सावलीच्या शीतलतेवर सुद्धा शंका असते. सतत कुरबुर करणाऱ्या या किरकीऱ्या लोकांना वृक्षाची छाया, माणसांची माया आणि विश्वासार्हतेची किमया कशी जाणवणार?? सतत साशंक राहून उन्हात होरपळण्यापेक्षा एखादा क्षण वृक्षाच्या सावलीत निश्चिन्त विसाऊन पहा बरे!!!

✍🏻✍🏻डॉ. स्वप्ना

🤟🏻आपण सारे मीठ होऊया🤟🏻

🤟🏻आपण सारे मीठ होऊया🤟🏻
पसरला आहे काळोख दाट, 
आपण सारे पहाट होऊया. 
खोल बुजलेत मधुर पाट, 
आपण सारे रहाट होऊया.
असे ही वेडीवाकडी वाट, 
आपण सारे नीट होऊया. 
असत्याने घातलाय घाट,
आपण सारे धीट होऊया. 
असेल आला जगण्याचा वीट,
आपण सारे प्रीत होऊया. 
उसळली असे रागाची लाट,
आपण सारे गीत होऊया.
हरवलेल्यांचा इथे थाट,
आपण सारे वाट होऊया. 
लाचारीने नाही वाकवायची पाठ,
आपण सारे ताठ होऊया.
सांजकाली नको सोडूस हात,
आपण सारे वात होऊया. 
कुणी असे दगड, कुणी असे माठ,
आपण सारे साथ होऊया.
 
ना तुझी ना माझी पीछेहाट,
आपण सारे जीत होऊया.
विसरुनी जाऊ जात पात,
आपण सारे मित होऊया. 
आळणी असे जीवनाचे ताट, 
आपण सारे मीठ होऊया. 
तुषारुनी मधुर घट,
जगण्याची रीत होऊया.
✍🏻 स्वप्ना

सकारात्मक ऊर्जा

सकारात्मक ऊर्जा
हॉस्पिटल एक युवक भेटायला आला, १६-१७ वर्षांचा असेल, मला आठवले की यापूर्वी 2-3 वेळा, त्याच्या आईच्या टेस्टस आणि रिपोर्ट्स साठी तो मला भेटला होता. अगदीच निरागस आणि किंचितसा मंद. भेटल्यावर त्याने मला एक चॉकलेट दिले, आणि बोलला की माझा वाढदिवस आहे मला आशीर्वाद द्या. त्याच्या आजाराचा भाग असेल अगदी निरागसतेने  बोलला  Thank you mam. Love you Mam. Please bless me. I said God bless you.  परत बोलला माझ्या आईला आशीर्वाद द्या. ती लवकर बरी होऊ दे. त्याची आई सोबत नव्हती, मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले तर त्याने आईचा केस पेपर माझ्यासमोर धरला व बोलला माझ्या आईला आशीर्वाद द्या. ती लवकर बरी होउ दे.  I put my hand on case paper and said God bless your mom. She will get well soon.
त्याच्या निरागस चेहऱ्यावर समाधान पसरले आणि खुश होऊन निघून गेला. क्षणभर मला समजलच नाही काय घडले, विचार करत राहीले आईसाठी पब्लिक हॉस्पिटल मध्ये धावपळ करताना सुद्धा स्वतःचे निरागस पण जपून ठेवलेल्या या मुलाने मला सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा दिली. न दिसणाऱ्या, न कळणाऱ्या गोष्टींची अनुभूती दिली आणि ती पसरतेय सगळीकडे लहरींसारखी.
✍️ डॉ. स्वप्ना